कार्यकारिणी निवडीची कोंडी फुटणार का?
कोरोना महामारीच्या काळात गेल्या पाच महिन्यांपासून ठप्प झालेल्या राजकीय घडामोडी आता वेगवान झाल्या आहेत. काल दिवसभर भाजपने घंटानाद आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला. लोकभावना जागवणार्या विषयावर आंदोलन करीत कार्यकर्त्यांत नवचैतन्य जागवण्याचा प्रयत्न केला. शहर जिल्हा कार्यकारणी निवडताना झालेली पक्षाची कोंडी या आंदोलनानंतर तरी फुटणार का ? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडीचे सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाने दस्तक दिली. त्यामुळे सरकार विरोधात आंदोलन करण्याची संधी ते प्रमुख विरोधी पक्ष म्हणून भाजपला गवसली नव्हती. राज्यातील मृत्युदर, वाढता संसर्ग यासह मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याबद्दल आरोप-प्रत्यारोप करून भाजपने राजकीय जुगलबंदी सुरू ठेवली होती. मात्र थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करता आले नाही. मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर भाजपचे हे पहिलेच मोठे आंदोलन ठरले. विशेषत: ज्या शहरात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तेथे नेत्या कार्यकर्त्यांमध्ये जोश दिसून आला. शहरातही भाजपने नियोजनबद्ध पद्धतीने आंदोलन केले.
पक्षांतर्गत कोंडी फुटेल का ?
दरम्यान, शहर तसेच जिल्हा कार्यकारणीच्या यादीवर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून निवड रखडली आहे. त्यामुळे कार्यकर्तेही निराश झाले आहेत. पदांसाठी नेत्यांमध्ये मतभेद तर कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच दिसून येते. अशा परिस्थितीत कालच्या आंदोलनात कार्यकर्ते जमा करताना नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. पदाधिकार्यांमध्ये उत्साह जागवण्याचा प्रयत्न करीत नेत्यांनी आंदोलनाला धार चढवली असली तरी कार्यकारणी निवडीची कोंडी आता तरी फुटणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.